Friday, August 29, 2008

'मनसे' चा दणका...

राज ठाकरेंनी काल संध्याकाळी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा सरकारने सुटल्याचा सुस्कारा सोडला असेन. आणि यापुढे पुन्हा त्रास नको म्हणून लगेच महानगरपालिकेला मराठी पाट्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

राज ठाकरेंचा दरारा खरेच एवढा आहे की जवळपास ८०% व्यापार्‍यांनी मराठी पाट्या तयार करायच्या ऑर्डर्स दिल्या आहेत, हे मी नाही तर पुण्यातले प्रतिष्ठीत दैनिक 'सकाळ' चे शब्द आहेत. या लिंकवर ही बातमी वाचावयास मिळेल. : http://www.esakal.com/esakal/08292008/Specialnews15BDC6FE85.htm
खरे तर हे वाचून खूप बरे वाटले. मी इकडे कर्नाटकात गेली चार वर्षे आहे. फक्त इंग्रजीत पाटी इकडे मी देखील पाहीली नाही....पिझ्झा हट , मॅक्डोनाल्ड्स पण कन्नड भाषेत पहावयास मिळते इकडे. ज्या प्रदेशात कोणतेही दुकान वा कंपनी स्वतःचे ऑफीस थाटते तेथील स्थानिक भाषेत त्या संस्थेने वा कंपनीने स्वतःचे नाव लिहावे असा कायदाच आहे मुळी. कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही म्हणून त्याविरुद्ध आवाज उठविला तर राज ठाकरेंनी काय चूक केली?राज ठाकरे जे बोलतात त्याच्या मुळाशी सत्य असते, अभ्यास असतो हे सरकारला माहीत आहे. स्वतःचे नाकर्तेपण मान्य आहे वा मनात आतून कोठेतरी त्यांचे मराठी मन राज ठाकरेंच्या आवाजाला ओ देते म्हणून की काय राज ठाकरेंविरुद्ध नेहमी चौकशी करु , कायदा सर्वांसाठी सारखा आहे अशी गुळमुळीत उत्तरे प्रेसला देतात. आणि हिंदी भाषिक चॅनेल मात्र अवाच्या सव्वा करुन सांगतात हेही तितकेच खरे आहे. राज ठाकरे प्रत्येक भाषणात जय महाराष्ट्र , जय हिंद असे म्हणतात. ते जय हिंद हे देशासाठी असते हे या चॅनेल्सवाल्यांना ऐकू येत नाही का?

स्थानीक भूमिपुत्रांना योग्य सन्मान द्यावा ही त्यांनी अपेक्षा केली तर काय चूक केली? इकडे बंगळूरात तुमच्या वा हिंदी भाषेत दादागिरी करुन दाखवा बरे? तेवढी हिम्मत या उत्तर भारतीयांमधे नक्कीच नाहिये. सामावून घेणे , आपलेसे करुन घेणे ही मराठी संस्कृती आहे. पण याचा गैरफायदा घेऊन आपल्यालाच घरातून कोणी बाहेर काढू पहात असेल तर संघर्ष हा केलाच पाहिजे. इतिहास साक्ष आहे, दिल्लीच्या चुकांकरिता फक्त मराठी माणूसच धावून आलेला आहे. मग ते स्वतःचे पानिपत करवून घेऊन का असेना, मराठी माणूस दिलेला शब्द पाळतो. अर्थात भाऊबंदकी पण आपल्यात तेवढीच आहे. त्याचाच हे बाहेरचे फायदा घेतात. पण हे आमच्या लक्षात येत नाही. असो... हा आजचा विषय नाही. आज आनंद साजरा करायचा तो एका तडफदार मराठी नायकाच्या यशाचा....
राज ठाकरेंनी बाहेरुन येऊन मुंबई स्वतःची जहागीर असल्याच्या थाटात जे वावरत होते त्यांना धडकी भरविली आहे यात काही संशय नाही.

जय महाराष्ट्र !!! जय हिंद !!!

- सागर

Wednesday, August 27, 2008

कोसीचे अश्रू

कालच मी सगळ्या न्यूज चॅनल वर एकच बातमी सविस्तर पणे पहात होतो.बिहार मध्ये कोसी नदीने कहर केला त्याची बातमी होती ती.

न्यूज चॅनल सगळे एकजात प्रसिद्धीसाठी एकाच बातमीचा मोठा प्रपोगंडा करुन खूप मारा करतात हे खरे आहे.पण जे काल मी पाहीले त्यात विदारकताही तितकीच होती.

मनापासून सांगतो, मी राज ठाकरे यांचा भक्त आहे. मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, एवढ्या पोटतिडकीने भांडणारा एकही माणूस मी पाहीला नाही. अवघा महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या मागे उभा राहिला पाहिजे. मी अधून मधून कधीतरी मुंबईला जातो तेव्हा लोकल मधून प्रवास करणारे यूपी-बिहारी मराठी मुलींना शिट्ट्या मारुन छेडतात तेव्हा रक्तच सळसळते. राज ठाकरे यांचा सध्याचा जो मोठा आक्षेप आहे तो सर्व उत्तर भारतीयांना नव्हे तर "गुंडगिरी" करणार्‍या उत्तर भारतीयांकरिता आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. आपल्या मुली घरातून बाहेर गेल्या की तितक्याच सुरक्षितपणे परत यायला हव्यात हे फक्त मराठी आई-बापांनाच नव्हे तर उत्तर भारतीय आई-बापांकरीता देखील लागू आहे....पण मी बोलत होतो ते बिहारमध्ये कोसी नदीने ढाळलेल्या अश्रूंबद्दल.


न्यूज चॅनल्स गाजावाजा करतात हे खरे आहे. पण त्यामुळेच सत्य सर्वसामान्यांपर्यंत तरी पोहोचते...तिकडे दिल्लीत लालू प्रसाद सांगताहेत की बिहार सरकार काहीच करत नाही. खरे आहे त्यांचे.पण लालूप्रसाद जरी सत्तेवर असते तरी त्यांनी नितिशकुमारांनी जे केले त्यापेक्षा काही वेगळे केले नसते. नदीने १२० किलोमीटरने पात्र बदलले तर त्याला लालूप्रसाद-नितिशकुमार काय करतील


हा आजपर्यंतचा इतिहास आहे की निसर्गाच्या शक्तीपुढे मानवाची शक्ती कायम तोकडी पडली आहे.निसर्गावर आक्रमण केले की त्याचा फटका आपल्याला कधीना कधी बसणारच. तिकडे नेपाळमधे धरण भंगले तर पूर येईन नाहीतर काय होईन? अशा आपत्ती नियोजनाकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांकडे आपत्ती हाताळण्यासाठी विशेष दले असली पाहिजेत. सामग्री असली पाहिजेत.मी 'वोल्कॅनो' हा एक इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्यात अशा प्रकारच्या आपत्ती हाताळण्यासाठी एक विशेष दल असलेले दाखवले आहे. आपल्याकडे अशी आपत्ती आली की सैनिकी सहाय्यता घेतली जाते. मुळात अशी दलेच अस्त्तित्त्वात नाहीत तर सैन्यावर हा ताण पडणारच. सैन्याची कार्यक्षमता लढाई व तत्सम कारणांकरिताच वापरायला हवी.आर्य चाणक्यांनी देखील कौटीलीय अर्थशास्त्रात सैन्याची कामे नेमून दिलेली आहेत. ते जरी आज तंतोतंत पाळले तरी अशा आपत्तींना आपण तोंड देऊ शकू...

मुळात एकसंध भारत होणे गरजेचे आहे. आपण सगळे आपापसात भांडत बसतो. राष्ट्रीय हित कोणीही लक्षात घेत नाही.लोकांच्या आपत्तींवर नेतेलोक दिल्लीत बसून आपल्या पोळ्या भाजतात.

पण २० लाख लोक बेघर झाले, ३० हजारावर लोकांचा पत्ता नाही. अरे एक माणुसकी म्हणून तरी कोणी या घटनेकडे पहावे.... भूकंप झाला , सुनामी आली की लगेच मोठ्या देणग्या गोळा होतात.कोसीचे अश्रू पुसताना मला तरी कोणी दिसत नाही...आता पूर ओसरला तर महामारीचा मोठा धोका आहे. अशा वे़ळी औषधे, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी सर्सामान्य माणूस केवळ झगडतानाच दिसणार आहे.आपापसातील हेवेदावे अशा वेळी सर्वांनीच बाजूला ठेवावे असे मला वाटते.

माणुसकी पेक्षा जगात कोणतीही गोष्ट मोठी नाही....
देव कोसीचे अश्रू पुसण्यासाठी सर्वांना मदत करण्याची सद्बुद्धी देवो.....


- सागर

Friday, August 15, 2008

"सोनेरी पहाट" जन्माला आली आहे.

"सोनेरी पहाट" हे एक चिंतन आहे. एक यज्ञ आहे, लोकांच्या साखरझोपेचा भ्रम मोडण्याचा
मला माहीत नाही माझ्या या ब्लॉग मुळे किती लोक जागृत होतील. किंबहुना माझे असे मत आहे की आजचा समाज हा जागृतच आहे.
पण नक्की काय केले पाहिजे हे त्याला कळत नाही. आपण सर्वसामान्य माणसे घडणार्‍या घटना फक्त बघत बसतो. प्रत्यक्ष घटनेचा भागीदार होण्यापेक्षा आपण साक्षीदार होणे जास्त पसंत करतो.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व वाचकांना काही कृती करण्याजोग्या गोष्टी तर सुचवेनच , पण तत्कालीन राजनीती कोणत्या दिशेने चालली आहे आणि आपले सर्वसामान्यांचे त्यात कोणते स्थान असले पाहिजे यावर प्रकाशझोत टाकणार आहे. यात लिहीत असलेल्या गोष्टी मला स्वत:वरही लागू होतील. येथील माझे लेखन हे एक व्यक्ती म्हणून केलेले नसून समाजाच्या दृष्टीकोनातून केलेले असेन.
तेव्हा भेट देत रहा आणि ही "सोनेरी पहाट" केवळ माझी एकट्याचीच नाही तर ती त्तुम्हा-आम्हा सर्वांचीच सोनेरी पहाट आहे.
प्रत्येक मनुष्याने - अगदी सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत - आपले आयुष्य निर्भय , सुखात, आणि आनंदाने जगावे या मताचा मी आहे.
जीवनावर मी खूप प्रेम करतो, जे मी पाहीले, भोगले, जाणवले त्यातून "सोनेरी पहाट" जन्माला आली आहे.
ही सोनेरी पहाट सर्वांच्या आयुष्यात आनंद देणारी होवो हीच सर्वव्यापी निसर्गशक्तीकडे प्रार्थना.....